Tuesday, January 29, 2013

चांदोबाची गंमत

चांदोबा जेव्हा शाळेत गेला
तीन तास अभ्यास केला.
चांदोबाला मग भूक लागली
तूप रोटी फस्त केली.
चांदोबाची भूक भागेना
काय करावे कळेना.

वर्गात होते शंभर तारे
चांदोबाचे दोस्त सारे.
डब्यात तार्‍यांच्या होता भात
चांदोबानी चाटून केला साफ.
चांदोबाची ढेती टम्म फुगली
आणि छोटी ढेकर आली.

चांदणी होती वर्गात
खुदकन हसली गालात.
तारे हसले खो खो खो...
चांदोबा रडला धो धो धो...

रुसून चढला झाडावर
चांदोबा शाळा सुटल्यावर.
काही केल्या उतरेना
चांदोबा रुसवा सोडेना.
बघता बघता रात्र झाली
वार्‍यासोबत थंडी आली.

चांदोबाला आठवली आईची कुशी
धपकन खाली मारली उडी
घसरला पाय उजवा
मैदानात झाला आडवा.
पांढरा शर्ट धुळीत मळला
चांदोबावर डाग पडला.
धूम घरी पळून गेला
आईच्या कुशीत झोपून गेला.

No comments:

Post a Comment