Friday, July 16, 2010

जेम्स लेन: काही प्रश्न

जेम्स लेनची वात्रटिका आणि महाराष्ट्रातील चालू असलेल्या तमाशाबद्दल काही प्रश्न
१. त्या पुस्तकावर फक्त महाराष्ट्रात बंदी घालून काय साध्य होणार आहे? देशाच्या इतर भागात तसेच जगभरात ते पुस्तक विकले जाणारच. जरी त्या पुस्तकाच्या सर्व छापील प्रती जाळून टाकल्या तरी इंटरनेटच्या माध्यमातून ते पुस्तक सहज कोणालाही उपलब्ध होऊ शकते. amazon.com आणि इतर अनेक संकेतस्थळांवरून हे पुस्तक सहजी उपलब्ध आहे. मग त्यातून होणार्या महाराजांच्या मानहानीबद्दल आपल्याला काहीच घेणे देणे नाही का?
२. लेनचा पुतळा जाळणे किंवा प्रतीकात्मक हत्तीच्या पायी देणे असले पोरखेळ करून नक्की काय साध्य होणार आहे?
३. लेनवर राग म्हणून भांडारकर संस्थेसारख्या soft target वर विनाकारण हल्ला का?
४. लेन पुस्तक लिहून महाराजांची बदनामी करतो. मग आपल्याकडचे सगळे इतिहास संशोधक काय करत आहेत? महाराजांच्या जीवनावर ऐतिहासिक पुराव्यांच्या सहाय्याने प्रकाश टाकेल असा उत्तम संशोधनपर ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमधून एकाच वेळी आपण का प्रकाशित करू शकत नाही?
५. मुंबईमध्ये समुद्रात स्मारक उभारणे जास्त महत्वाचे की गड-किल्ल्यांची डागडुजी करणे, महाराजांच्या जीवनावर आधारीत कलाकृतींना आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे महत्वाचे?
६. शिवकालाची समग्र माहिती देणारे उत्तम संकेतस्थळ विकसित करण्यासाठी सरकार किंवा आंदोलनकर्ते यापैकी कोणीही पुढाकार का घेत नाही? असे संकेतस्थळ असेल तर लेन किंवा त्याच्यासारखे लोक सहज उघडे पडतील. ही दूरदृष्टी अधिकारपदावरील एका तरी व्यक्तीस आहे का?
७. महाराजांच्या नावानी घाणेरडे जातीय राजकारण करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या नव"जाणत्या राजाला" आणि त्याच्या पिलावळीला चाप कोण लावणार?
८. अनेक तथाकथित हिंदुत्ववादी नेत्यांनी लेनची पाठराखण केली आहे. त्यांना जाब कोण विचारणार?
९. सर्वात महत्वाचं, यापुढे असा विकृत लेखन कोणी केलं तर आपण परत असेच साप साप म्हणत भुई धोपटत  बसणार का?

No comments:

Post a Comment