Friday, November 21, 2025

आराधना


गर्द होता अंधार थोडा, सांजवारा सर्द झाला 

वळण घेऊन थबकली, वाट थोडी बावरीशी 

स्तब्ध पाती थांबलेली, एकमेकांच्या कुशीत 

पंख सैलावून पक्षी, एकमेकांच्या उबेत 

काजवेही पहुडलेले, नक्षत्र सांडून भूवरी 

आळसावे डोह काळा, पिऊन काळी साउली 

विश्राम देऊन जाणिवेला, नेणिवेची साधना 

मंद गाणे निर्झराचे, निर्गुणाची आराधना




सोऽहम

 शांततेला भेदूनी, आर्ततेची साद येता

जागृताला सोडूनी , अंतरीचे भान येता

भावनांना थिजवूनी, अनुभवाची जाण येता

भवताल सारा विसरुनी, मी पणाचा शोध घेता

घेतलेला श्वास जेव्हा, चैतन्यचांदण भासतो

सोडलेला उच्छवासही, वादळासम धावतो

उजळलेला एक क्षणही, काळास व्यापून टाकतो

कोऽहमाच्या गूढगर्भी, सोऽहमाचा सूर्य फाकतो