Wednesday, June 25, 2025

कृष्ण सोहळा

कृष्ण सोहळा




अस्ताची चाहूल लागे, विस्तीर्ण तळे काळोखे

पक्ष्यांचे तंबू हलले, आभाळ निळे काजळते 

अंधार लागला साचू, क्षितिजावर काजळमाया 

दिशांचे कोनही हलले, आभाळ निळे काजळते 

असण्याचा हरवे पत्ता, नसण्याचा डंखही गहिरा

प्रश्नांचे जाळे पसरे, आभाळ निळे काजळते

सुन्नता भिने  सर्वांगी, कोलाहल दाटे ओठी 

शब्दांचे फुटले साचे, आभाळ निळे काजळते

जाणिवेची ठरली सीमा, भावांच्या पुसटशा रेषा 

अपूर्णाचे डोहाळे भरले, आभाळ निळे काजळते

शांत सुन्या संध्येचा, हा आंधळा कृष्ण सोहळा 

जग मुकाट मग विरघळते, आभाळ निळे का जळते? 

अंधाराची सावली

 



अस्तित्वाच्या भासाला, ती कधीच  शोधत नाही 

अंताच्या प्रलयीसुद्धा, ती कधीच संपत नाही 

जाणिवेच्या नाट्यरंगी, ती कधीच रंगत नाही 

नेणिवेच्या आडरानी, ती कधीच हरवत नाही 


रस्त्यावर दगड मैलाचे, ती कधीच मोजत नाही 

ध्येयाचे शिखर हिमाचे, ती कधीच मापात नाही 

पटावर गूढ मनाच्या, ती कधीच खेळत नाही 

शक्य अशक्याचे फासे, ती कधीच फेकत नाही 


किरणांनी क्षितिज उजळले, ती कधीच आकसत नाही 

बुडत्या विझल्या सूर्याला, ती कधीच डिवचत नाही 

ताऱ्यांच्या इवल्या टिकल्या, ती कधीच चिरडत नाही 

ब्रह्माण्ड कवेत सगळे, ती कधीच तोलत  नाही 


ती कधीच उमगत नाही, ती कधीच गवसत नाही 

ती अंधाराची सावली, ती मुळीच साधी नाही 

ती मुळीच साधी नाही 




रस्ता

रस्ता 

हजारो पायांनी रोज तुडवला 
वाहनांखाली दिवसरात्र चिरडला 
धूळ कचऱ्यानी माखून गेला 
रणरणत्या उन्हात रापून गेला 
पावसाच्या धारांत न्हाला 
थंडीच्या कडाक्यात गारठला 
रुंदीकरणात प्रसवाला 
अतिक्रमणानं आक्रसला 
डांबराच्या लेपानं चकाकला
खड्ड्याच्या जखमेनं विव्हळला 
मोर्चाच्या आक्रोशानं बधीर झाला
मिरवणूकीच्या आनंदात सामील झाला 
अपघातांचा मूक साक्षीदार झाला 
गुन्हे पाहणारा अजून एक बघा झाला 
जगाचा रहाटगाडा फिरत राहिला 
रस्ता ... रस्ता मात्र इथेच राहिला